पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज
पुणे | प्रतिनिधी
पुणे विमानतळाला देशातील महत्त्वाच्या विमानतळांच्या यादीत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेल लागू करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. या अनुषंगाने नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), सीआयएसएफ, इमिग्रेशन, सीमाशुल्क विभाग तसेच विविध विमान कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळाची पाहणी करून आवश्यक सुविधा, प्रवासी व्यवस्थापन आणि कार्यपद्धतीचा आढावा घेतला आहे.
या मॉडेलअंतर्गत पुणे विमानतळ ‘स्पोक’ म्हणून कार्य करेल, तर दिल्लीसारखे मोठे विमानतळ ‘हब’ म्हणून वापरले जातील. त्यामुळे पुण्यातून प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची इमिग्रेशन व सीमाशुल्क प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
अधिकाऱ्यांनी टर्मिनलमधील प्रवासी हालचाल, सुरक्षा व्यवस्था, बॅगेज हाताळणी, विविध विभागांतील समन्वय, विमान कंपन्यांच्या सुविधा आणि भविष्यातील प्रवासी वाढ लक्षात घेऊन आवश्यक बदलांचा अभ्यास केला. या प्रक्रियेमुळे विमानतळाची कार्यक्षमता वाढविणे, प्रवाशांचा वेळ वाचविणे आणि विमान बदलण्याची प्रक्रिया अधिक सोपी करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
हब-अँड-स्पोक मॉडेल म्हणजे काय?
मोठ्या शहरातील विमानतळ ‘हब’ म्हणून विकसित केला जातो.
पुण्यासारखी प्रादेशिक विमानतळे ‘स्पोक’ म्हणून त्या हबशी जोडली जातात.
प्रवासी प्रथम हब विमानतळावर पोहोचून तेथून देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानाने पुढील प्रवास करतात.
या व्यवस्थेमुळे विमान कंपन्यांचा खर्च कमी होतो, प्रवासी जोडणी वाढते आणि विमानतळांचा अधिक कार्यक्षम वापर होतो.
तज्ज्ञांच्या मते, ही योजना पूर्ण क्षमतेने राबविली गेल्यास पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक वेगवान, नियोजित आणि प्रवासी-अनुकूल होऊ शकतो. तसेच भविष्यात पुण्याची राष्ट्रीय आणि जागतिक हवाई संपर्क क्षमता अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.