पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज
UdyogNews.in | नागरिकांचा सवाल : अजून किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?
चिखली : चिखलीतील ताम्हाणे वस्ती येथील सिद्धार्थ बुद्धविहाराजवळ युवराज एंटरप्रायझेस कंपनीत बुधवारी (दि. १२) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास अचानक स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.
भट्टीच्या कॉम्प्रेसरमध्ये बिघाड झाल्याचा प्राथमिक अंदाज
कंपनीत अॅल्युमिनियम मटेरियलवर पावडर कोटिंग करण्याची प्रक्रिया केली जाते. यासाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत भट्टीच्या कॉम्प्रेसरमध्ये अचानक बिघाड झाल्याने भट्टीचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या स्फोटात भट्टी, कॉम्प्रेसर तसेच खिडक्यांचे नुकसान झाले असून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनीचे मालक रामबली यादव यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच तळवडे येथील अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन साहित्य कार्यान्वित असल्याचे आढळून आले.
ताम्हाणे वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
ताम्हाणे वस्ती परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांची घरे व सोसायट्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या स्फोटाचा मोठा आवाज नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतो.
स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे की, निवासी वस्त्यांच्या अगदी जवळ भट्टी, अॅल्युमिनियम पावडर कोटिंग, लाकडी दरवाजे गरम करण्याच्या भट्ट्या, ब्लास्टिंग किंवा इतर संभाव्य धोकादायक प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांचे नियमित सुरक्षा परीक्षण कोण करणार?
PCMC आणि DISH विभागाला नागरिकांचा थेट सवाल
PCMC आणि DISH Factory License विभागाने स्पष्ट करावे —
“अशा प्रकारच्या धोकादायक ऑपरेशन्सवर कारवाई करण्यासाठी अजून किती जीवितहानीची वाट पाहिली जात आहे?”
चिखली, तळवडे आणि मोशी परिसरातील निवासी भागात काही ठिकाणी धोकादायक स्वरूपाच्या औद्योगिक प्रक्रिया सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून होत आहेत.
अॅल्युमिनियम पावडर कोटिंग भट्ट्या, लाकडी दरवाजे गरम करण्याच्या भट्ट्या, ब्लास्टिंग तसेच ज्वलनशील किंवा उच्च-जोखीम प्रक्रिया करणाऱ्या युनिट्सना PCMC, DISH आणि संबंधित अग्निसुरक्षा/पर्यावरणीय परवानग्या आहेत का? याची तपासणी होणे आवश्यक आहे, अशी नागरिकांची मागणी आहे.
तळवडे दुर्घटनेची पुनरावृत्ती नको
तळवडे येथील स्पार्किंग कॅण्डल उत्पादन युनिटला ८ डिसेंबर २०२३ रोजी लागलेल्या भीषण आगीत अखेरीस १४ जणांचा मृत्यू झाला होता. संयुक्त समितीच्या अहवालानुसार संबंधित युनिटकडे DISH, MPCB आणि इतर आवश्यक परवानग्यांचा अभाव असल्याचे समोर आले होते.
त्या दुर्घटनेनंतरही निवासी भागांमध्ये धोकादायक स्वरूपाच्या औद्योगिक प्रक्रिया सुरू राहणार असतील, तर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांची मागणी
UdyogNews.in शी बोलताना स्थानिक नागरिकांनी मागणी केली की, PCMC, DISH Factory License विभाग, अग्निशमन विभाग आणि इतर संबंधित प्राधिकरणांनी चिखली, तळवडे आणि मोशी परिसरातील निवासी वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या संभाव्य धोकादायक उद्योगांचे संयुक्त सर्वेक्षण करावे.
ज्या उद्योगांकडे आवश्यक परवानग्या, फायर सेफ्टी, कामगार सुरक्षा आणि इतर वैधानिक अनुपालने नाहीत, त्यांच्यावर नियमानुसार तातडीने कारवाई करावी.
नागरिकांचा स्पष्ट संदेश आहे — उद्योगांना विरोध नाही; मात्र निवासी भागातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारे उद्योग आणि धोकादायक प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत चालू ठेवू नयेत.
UdyogNews.in चा सवाल
PCMC आणि DISH विभागाने चिखली–तळवडे–मोशी परिसरातील अशा सर्व युनिट्सची तपासणी करून सार्वजनिकपणे माहिती द्यावी :
– किती युनिट्सकडे वैध Factory Licence आहे?
– किती युनिट्सकडे आवश्यक अग्निसुरक्षा परवानगी/व्यवस्था आहे?
– भट्टी, पावडर कोटिंग, ब्लास्टिंग आणि इतर धोकादायक प्रक्रिया करण्यास संबंधित ठिकाणी परवानगी आहे का?
– निवासी वस्त्यांच्या जवळ अशा प्रक्रिया करण्यासाठी कोणते सुरक्षा निकष लागू आहेत?
– नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई कधी होणार?
एक स्फोट झाला आणि जीवितहानी टळली म्हणून धोका संपला असे समजायचे का?
की मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन कारवाई करणार?
UdyogNews.in — उद्योग क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आवाज.