UdyogNews.in

पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज

भोसरीतील गैलेक्सी इंडस्ट्रीजला भीषण आग, Galaxy Industries Fire 🔥

24 August 2026 WhatsApp वर शेअर करा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

भोसरीतील गोलेक्सी इंडस्ट्रीजमध्ये आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

भोसरी, इंद्रायणी नगर परिसरातील गैलेक्सी इंडस्ट्रीज येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, आगीची सुरुवात सुरक्षा रक्षकाच्या केबिनजवळून झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच आगीने परिसरातील इतर भागातही फैलाव केला.

कंपनी परिसरात ऑईलचे कॅन आणि इतर औद्योगिक साहित्य असल्याने आगीची तीव्रता वाढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती नाही.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे. आगीमुळे कंपनीचे नेमके किती नुकसान झाले, याची माहितीही पुढील तपासणीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

औद्योगिक परिसरातील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील मोठ्या औद्योगिक क्षेत्रात विविध प्रकारचे कच्चे माल, ऑईल, रसायने आणि ज्वलनशील साहित्य हाताळले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी अग्निसुरक्षा, आपत्कालीन तयारी आणि कामगारांची सुरक्षितता यांना विशेष महत्त्व आहे.

गोलेक्सी इंडस्ट्रीजमधील घटनेनंतर औद्योगिक आस्थापनांनी अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, अग्निशामक उपकरणे आणि सुरक्षा प्रक्रियांची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

उद्योगन्यूजचा मुद्दा:
आगीचे कारण आणि नुकसानीचे अधिकृत चित्र तपासणीनंतर स्पष्ट होईल. मात्र, औद्योगिक परिसरात दुर्घटना घडल्यानंतरच्या प्रतिसादाइतकीच दुर्घटना टाळण्यासाठीची पूर्वतयारी महत्त्वाची आहे.

— उद्योगन्यूज | Udyognews.in