UdyogNews.in

पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज

चाकण MIDC सोडत आहेत उद्योग? चर्चेपेक्षा वस्तुस्थिती समजून घेणे महत्त्वाचे, “चाकणमधून मोठ्या प्रमाणावर कंपन्या बाहेर पडत आहेत” अशा दाव्यांसाठी अधिकृत आणि कंपनीनिहाय माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे.उद्योगांसाठी नव्या संधींचे संकेत! बहुमजली औद्योगिक संकुल;

11 August 2026 WhatsApp वर शेअर करा

चाकण MIDC सोडत आहेत उद्योग? चर्चेपेक्षा वस्तुस्थिती समजून घेणे महत्त्वाचे

चाकण : चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवरून गेल्या काही दिवसांत विविध चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणी चाकण MIDC मधील काही कंपन्या स्थलांतराचा विचार करत असल्याचेही म्हटले जात आहे.

मात्र, या चर्चेकडे पाहताना चाकणच्या औद्योगिक क्षेत्राचे संपूर्ण चित्र समजून घेणे गरजेचे आहे. उपलब्ध माहितीकडे पाहता चाकणमध्ये नवीन औद्योगिक विकासाच्या संधीही निर्माण होत असल्याचे दिसून येते.

“चाकणमध्ये बहुमजली औद्योगिक संकुल”

पुणे, ता. १० : चाकण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाजवळील खरावाडी गावात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) बहुमजली औद्योगिक संकुल उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी २८ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून, यामुळे लघु उद्योगांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादितने राज्य शासनातर्फे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडे यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. देशातील प्रमुख ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रांपैकी एक असलेल्या चाकण परिसरात लघु उद्योगांना चालना देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सध्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) आवश्यक कायदेशीर मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.

चाकणची औद्योगिक ताकद कायम

चाकण MIDC ही केवळ कंपन्यांची जागा नाही. या परिसराशी हजारो कामगार, छोटे-मोठे उद्योजक, ट्रान्सपोर्टर्स, वाहनचालक, हॉटेल व्यावसायिक, सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि स्थानिक व्यवसाय जोडलेले आहेत. त्यामुळे चाकणच्या औद्योगिक वातावरणाबाबत कोणतीही मोठी बातमी स्थानिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम करू शकते.

वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि वाढता ट्रॅफिक या निश्चितच चाकणसमोरील गंभीर समस्या आहेत. त्यावर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

परंतु, “चाकणमधून मोठ्या प्रमाणावर कंपन्या बाहेर पडत आहेत” किंवा “₹1,000 कोटींच्या औद्योगिक व्यवसायाला फटका बसणार आहे” अशा दाव्यांसाठी अधिकृत आणि कंपनीनिहाय माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे.

उलट, उपलब्ध औद्योगिक माहितीनुसार चाकण परिसराला अजूनही नवीन उद्योग आणि विस्तारासाठी मागणी आहे. Industrial land ची उपलब्धता आणि नवीन गुंतवणुकीची इच्छा यामुळे चाकणचे महत्त्व कायम असल्याचे संकेत मिळतात.

प्रश्न उद्योग स्थलांतराचा की पायाभूत सुविधांचा?

म्हणून प्रश्न फक्त “कंपन्या चाकण सोडत आहेत का?” एवढाच नसून,

“चाकणमध्ये वाढणाऱ्या औद्योगिक मागणीला आवश्यक पायाभूत सुविधा आपण वेळेत देत आहोत का?”

हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे.

चाकणला समस्या आहेत, हे मान्य करायला हवे. पण त्याचवेळी चाकणची औद्योगिक ताकद आणि येथे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

चाकणला बदनाम करण्याची किंवा समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही — गरज आहे ती वस्तुस्थिती समजून घेऊन उद्योग आणि प्रशासन दोघांसाठी योग्य उपाय शोधण्याची.

🟢 UdyogNews Fact Check

“20 कंपन्या स्थलांतरित होत आहेत” आणि “₹1,000 कोटींचा फटका” या दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी सध्या आवश्यक आहे.

मात्र, ₹28 कोटींच्या प्रस्तावित बहुमजली औद्योगिक संकुलासारख्या योजनांमुळे चाकण परिसरातील MSME उद्योगांना जागा आणि विस्ताराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या चर्चेबरोबरच चाकणमध्ये सुरू असलेला औद्योगिक विकास आणि भविष्यातील क्षमता याकडेही सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.

UdyogNews.in भूमिका :
चाकणच्या समस्या मांडूया; पण चाकणची औद्योगिक ताकदही जगासमोर आणूया.