UdyogNews.in

पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज

शिरगावातील (ता. मावळ) चार आस्थापनांचे सांडपाणी पवना नदीत; MPCBची २.५८ कोटींची नुकसानभरपाई

22 September 2026 WhatsApp वर शेअर करा

‘एमपीसीबी’च्या प्रतिज्ञापत्रातून गंभीर नोंद; सांडपाणी व लिचेट नाल्याद्वारे नदीत पोहोचल्याचे निरीक्षण

पिंपरी, ता. २१ : शिरगाव (ता. मावळ) परिसरातील काही आस्थापनांचे सांडपाणी आणि लिचेट (कचऱ्यातून निर्माण होणारा दूषित द्रव पदार्थ) नाल्याद्वारे थेट पवना नदीपर्यंत पोहोचत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नोंदविले आहे.

या प्रकरणात चार आस्थापनांना एकूण दोन कोटी ५८ लाख १७ हजार ५०० रुपयांची पर्यावरणीय नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) ‘एमपीसीबी’ने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली.

चार आस्थापनांवर निश्चित केलेली नुकसानभरपाई

गंगा पेपर्स इंडिया लिमिटेड, रायझिंग प्रॉपकॉन एलएलपी, मॅनेग्रो अँग्रो प्रॉडक्ट्स आणि काराग्या फूड्स या कंपन्यांवर नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. उल्लंघनाचा कालावधी आणि उद्योगांची श्रेणी विचारात घेऊन ही रक्कम निश्चित केली आहे.

‘ईटीपी’, ‘एसटीपी’ बंद असल्याची नोंद

मॅनेग्रो अँग्रो प्रॉडक्ट्सच्या पाहणीत ‘ईटीपी’ आणि ‘एसटीपी’ बंद असल्याचे आढळले. भुसा व बॉक्स धुण्यातून निर्माण होणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी आवाराबाहेर सोडले जात होते. त्यातून निर्माण होणारे लिचेट जवळच्या नाल्यातून पवना नदीला मिळत असल्याचे अहवालात नमूद आहे.

गंगा पेपर्स येथील ‘ईटीपी स्लज’मधील लिचेट नाल्यात जात असल्याचे, तसेच कागदी कचरा व मैलायुक्त गाळ (स्लज) उघड्यावर साठविल्याचे आढळले. कामगार आणि पॉवर प्लांटमधील सांडपाणीही नाल्यामार्फत पवना नदीपर्यंत पोहोचत असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

तर, रायझिंग प्रॉपकॉनच्या मागील नाल्यातही हा विसर्ग आढळला. नाल्यालगत कचरा आणि बांधकामाचा राडारोडा टाकल्याचे मंडळाने नोंदवले आहे.


UDYOG NEWS.IN | INDUSTRY • REGULATION • IMPACT


Editor@Udyognews.in