पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज
११ ऑगस्ट २०२६ रोजी जलशक्ती मंत्रालयाच्या NRCD विभागाचे मा. संयुक्त सचिव श्री. झैगम अली खान यांच्या अध्यक्षतेखाली मुळा-मुठा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या (Pollution Abatement of River Mula-Mutha – PARMM) प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीस NRCD विभागाचे अधिकारी, मा. महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी तसेच प्रकल्पाचे जनरल कन्सल्टंट उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मुळा-मुठा नदीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा, सुरू असलेल्या कामांचा तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या कामांना गती देणे, कामांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच निर्धारित उद्दिष्टांनुसार प्रकल्पाची कार्यवाही सुनिश्चित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीनंतर मा. संयुक्त सचिव श्री. झैगम अली खान यांनी NRCD विभागाच्या अधिकाऱ्यांसह तसेच मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (ज) श्रीमती पवनीत कौर यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांसह गणेशखिंड बोटॅनिकल गार्डन (औंध रोड) येथील STP प्रकल्पस्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाची व प्रगतीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करून नदीचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन व स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे.