पुणे औद्योगिक क्षेत्राचा बुलंद आवाज
रांजणगावातील या उपक्रमातून पुणे जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा संदेश समोर येतो—औद्योगिक क्षेत्रातील अपघात रोखण्यासाठी केवळ सुरक्षा नियम पुरेसे नसून, प्रत्येकाच्या वर्तनात सुरक्षिततेची सवय रुजणे आवश्यक आहे. याच उद्देशाने रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशन आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (DISH) तर्फे अधिकारी व सुपरवायझर्ससाठी प्रशिक्षण घेण्यात आले.
रांजणगाव एमआयडीसीतील विविध उद्योगांमधील अधिकारी व प्रतिनिधींनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रसिद्ध सुरक्षा तज्ज्ञ डॉ. एच. एल. कैला यांनी कार्यस्थळावरील संभाव्य धोके ओळखणे, असुरक्षित वर्तनाचे निरीक्षण करणे आणि सुरक्षित सवयी विकसित करण्याच्या प्रभावी पद्धतींबाबत मार्गदर्शन केले.
रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील आणि संचालक रमेश शिंदे यांनी, “सुरक्षितता ही केवळ नियमांचे पालन न राहता प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन वर्तनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे,” असे प्रतिपादन केले.
औद्योगिक सुरक्षितता ही केवळ कामगारांची नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांशीही संबंधित सामूहिक जबाबदारी आहे. रांजणगाव एमआयडीसीतील उद्योगांमध्ये अपघातांना प्रतिबंध करून ‘एकही हानी होऊ नये’ या जबाबदारीने सर्वांनी कामकाज करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कामकाजातील वर्तनाचे निरीक्षण, सुरक्षित सवयींना प्रोत्साहन आणि असुरक्षित वर्तन कमी करण्यावर भर देण्यात आला. छोट्या निष्काळजीपणातून मोठे अपघात घडू शकतात. त्यामुळे धोका निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तो निर्माण होण्यापूर्वीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाय करणे अधिक प्रभावी असल्याचे प्रशिक्षणातून स्पष्ट करण्यात आले.
रांजणगाव एमआयडीसीतील या प्रशिक्षणाचा संदर्भ घेतला तर पुणे जिल्ह्यातील चाकण, भोसरी, तळेगाव, रांजणगाव आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये DISHच्या अशा जनजागृती कार्यक्रमांची व्याप्ती आणखी वाढविण्याची गरज अधोरेखित होते.
औद्योगिक सुरक्षेचा विषय केवळ अपघात झाल्यानंतरच्या तपासणीपुरता मर्यादित न राहता, अपघात होण्यापूर्वीच धोके ओळखणे, कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन देणे आणि सुरक्षित कामकाजाची सवय निर्माण करणे या दिशेने पुढे जाणे आवश्यक आहे.
रांजणगावातील कार्यक्रमाने दाखवून दिले आहे की उद्योग व्यवस्थापन, अधिकारी, सुपरवायझर, कामगार संघटना आणि DISH यांचा समन्वय वाढला तर ‘अपघातमुक्त उद्योग’ हे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकते.
पुण्याच्या औद्योगिक विकासासोबत सुरक्षिततेची संस्कृतीही मजबूत होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे DISHच्या प्रशिक्षण व जनजागृती उपक्रमांना अधिकाधिक उद्योगांनी सकारात्मक प्रतिसाद देणे आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग घेणे, हा औद्योगिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा पुढचा टप्पा ठरू शकतो.